अचानक मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न चिखलात – कपाशी, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान
किनवट : दि. १५ ऑक्टोबर रोजी बुधवारी दुपारी एकच्या सुमारास झालेल्या अचानक अति मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतला. दिवसभर कोरडे आकाश आणि उन्हाची चाहूल असताना अचानक काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसू लागला. काही तासांतच संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला, शेतकरी अवाक् झाले, आणि शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
प्रधानसांगवी, बेंदी, दाभाडी, चिखली परिसरात हा पाऊस विशेषतः तडाखेबाज झाला. अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतांमध्ये पिके पार आडवीच झाली. तर काहींच्या शेतात सोयाबीन कापणी करून रानात ढीग करून सुकवण्यासाठी ठेवलेले होते. परंतु या अचानक झालेल्या पावसाने कपाशी ओलसर झाली, सोयाबीन आणि मका पिके चिखलात मिसळून गेली, तसेच गाव गाड्यातील अंगणात वाळत ठेवलेला सोयाबीन व मका पूर्ण भिजला.
या भागातील शेतकरी आधीच मागील महिन्याच्या पावसामुळे आणि बाजारातील घसरणीमुळे आर्थिक अडचणीत सापडले होते. सरकारने काही प्रमाणात मदत जाहीर केली असली, तरी ती अजूनपर्यंत बहुतांश शेतकयांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर शेतकरी आधीच चिंतेत होते, आणि या अनपेक्षित पावसाने त्यांच्या मनातील आशेचा किरणही विझवला.
प्रधानसांगवी येथील शेतकरी व पत्रकार असलेले लक्ष्मीकांत मुंडे यांच्या शेतातील कापून जमा केलेला अंदाजे 40 क्विंटल सोयाबीन चा ढीग डोळ्यादेखत भिजून गेला तर बालाजी गिते यांच्या शेतातील कपाशीचे पीक पूर्णपणे आडवे झाले. बेंदी येथील एका शेतकऱ्याने वाळवून गोणी भरून साठवून ठेवलेला घरातील सोयाबीन घरावरील पत्रे उडाल्यामुळे चक्क पूर्णपणे भिजून गेला परिसरातील शेतकरी सांगतात की, “हवामान खात्याने कोणताही अंदाज दिला नव्हता. सकाळपर्यंत आकाशात एकही ढग नव्हता, आणि काही तासांतच ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. एवढ्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतातील आणि घरातील सगळं उद्ध्वस्त केलं.”
या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खोल चिंता दिसत आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, दुसरीकडे बाजारातील दरघट आणि न मिळालेली सरकारी मदत — अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता प्रश्न पडतोय की, “नुकसान भरपाई मागायची तरी कुणाकडे – सरकारकडे की देवाकडे?”